राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'

राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'

पुणे (प्रतिनिधी) : देशाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात 'छात्रों की गूंज' हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच पुण्यातील शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्यात शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून मोठा असंतोष आहे. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच भाडोत्री गुंड पाठवून हा कार्यक्रम उधळण्याचा आणि स्टंट करण्याचा कट रचला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला.

पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले की, सीईओपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवण्याचा अभाविपच्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. फक्त राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवलं म्हणून मुलींना धमकावण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गुंडांना कोणी दिला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही म्हणून मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारायचा, हीच भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या गुंडांना सरकारचं संरक्षण आहे का? असा सवाल करत, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही, असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष नेहमीच सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चालणारा आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी. सावित्रीच्या लेकींच्या सुरक्षेसाठी आणि अधिकारांसाठी हा संवाद कार्यक्रम ऐतिहासिक स्वरूपात पार पडेल.

विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या कार्यकर्त्यांवर आणि महिला कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्यात आली. मात्र, अशा धमक्यांना भीक न घालता विद्यार्थी मोठ्या संख्येने राहुल गांधी यांच्या संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मानसी या विद्यार्थिनीनेही आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, आम्ही शांततेत बसलेलो असताना अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन अंगावर धावून आले. त्यावेळी झालेल्या झटापटीत आणि गोंधळात पुरुष पोलीस अधिकाऱ्याने लाठीने आणि पायावर बुटाने जोरदार प्रहार केला. तसेच अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचा आरोप तिने केला.