विजय वडेट्टीवार यांची खोचक मागणी, 'त्या' कुत्र्याची एसआयटी चौकशी करा

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, ती सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टिप्पणी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "त्या कुत्र्याला काय दुर्बुद्धी सुचली की भिडेंना चावलं, हे कळेना! त्यामुळे या कुत्र्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे," अशी खोचक मागणी त्यांनी केली. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, "कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी आहे, पण प्रामाणिक प्राण्यालाही भिडेंविरोधात राग का आला, याचा शोध घेणं गरजेचं आहे."
मंगेशकर कुटुंबावर केलेल्या वक्तव्यांवर भूमिका कायम
विजय वडेट्टीवार यांनी लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबावर पूर्वी केलेल्या वक्तव्यांवर आपली भूमिका कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. "लता मंगेशकर छान गात होत्या, जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं, हे मान्य आहे. पण त्यांनी मुंबईतील एका उड्डाणपुलास वैयक्तिक कारणास्तव विरोध केला होता. देश सोडण्याची धमकी दिली होती हे विसरता येणार नाही," असं ते म्हणाले.
त्यांनी पुढे असा आरोपही केला की, लता मंगेशकर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमासाठी सुरुवातीला विनामूल्य येण्याचं कबूल केलं होतं, पण नंतर २२ लाखांची मागणी केली आणि त्यामुळे तो कार्यक्रमच रद्द करावा लागला.
भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर टीका
"भाजपमध्ये आता दोन गट पडलेत, त्यांना आमच्या शुभेच्छा. दोनच कशाला – तीन गट व्हावेत," असा टोमणा मारत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. "पूर्वी काँग्रेसमध्ये फूट पडली की भाजपला फायदा व्हायचा, आता आम्हाला फायदा होईल," असं म्हणत त्यांनी काँग्रेससाठी ही परिस्थिती अनुकूल असल्याचे सूचित केले.