वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली मजबुरी यांना सेवेतून कार्यमुक्त
कोल्हापूर (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव (ता. चंदगड) येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली राजेंद्र मजकूरी यांना शासकीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि विनपरवानगी गैरहजर राहिल्यामुळे सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.

डॉ. रूपाली राजेंद्र मजकुरी यांची १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीनंतर काही दिवसांतच त्या आपल्या कर्तव्यावर विनपरवानगी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपल्या पदाच्या जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यामुळे आणि प्रशासकीय शिस्तीचा भंग केल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत अधिक माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी स्पष्ट केले की, आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आरोग्य विभागात कार्यरत असणारे अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या कामात गैरवर्तन, अनधिकृत गैरहजेरी किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास, त्यांच्यावर देखील तात्काळ कडक प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.




