सुरज साखरे हल्ला प्रकरणात एलसीबीची धडक कारवाई ! गोळीबार करणारे २ आरोपी अवघ्या १२ तासांत गजाआड

सुरज साखरे हल्ला प्रकरणात एलसीबीची धडक कारवाई ! गोळीबार करणारे २ आरोपी अवघ्या १२ तासांत गजाआड

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या सुरज साखरे हल्ला प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय. अवघ्या १२ तासांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आरोपींना अटक केली. रफीक उर्फ देवा पिरसाहेब मुल्ला आणि शहाबाज राजू मुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

१६ जुलै रोजी दुपारी नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंगरोडवरील स्टार लोकल मार्टजवळ सुरज साखरे यांच्यावर दोन दुचाकीस्वारांनी भरदिवसा अंधाधुंद गोळीबार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यात सुरज साखरे गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तात्काळ विशेष पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतीने फिरवली.

तपासादरम्यान हे आरोपी गुन्हा करून कर्नाटकात पळून गेल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जयसिंगपूर जवळील अंकली पूल परिसरात दबा धरून सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सुरज साखरे यांच्यावर जीव घेण्याच्या उद्देशानेच गोळीबार केल्याची कबुली दिलीअसल्याची माहिती शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांनी दिली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला स्वतःच्या वैयक्तिक वादातून नसून, सुपारी घेऊन करण्यात आल्याची दाट शक्यता आहे. या भीषण हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि ही सुपारी कोणी दिली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत असून लवकरच यामागील मुख्य चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.