सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अटक; जुना राजवाडा पोलिसांनी १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने केले जप्त.

सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अटक; जुना राजवाडा पोलिसांनी १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने केले जप्त.

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या दुकानात काम करत होती, त्याच सोन्याच्या दुकानात तब्बल १७ लाख ८६ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला जुना राजवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. विशेष म्हणजे, पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपास करून १०५.०४ ग्रॅम वजनाचे सर्वच्या सर्व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठ देवकर पाणंद येथील 'दत्तात्रय तुकाराम कारेकर ज्वेलर्स' या दुकानात रोहित कारेकर यांच्याकडे संशयित आरोपी विद्या राजेंद्र जाधव (रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी) ही महिला कामगार म्हणून काम करत होती. २७ जुलै ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तिने दुकानातून टप्प्याटप्प्याने सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या, सोन्याचे कॉईन, लॉकेट्स आणि पिळाचे वळे असे १०५.०४ ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले.

दुकानाचे मालक रोहित कारेकर यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

संशयित महिला कर्मचारी विद्या जाधव हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसोशीने तपास करताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून १७ लाख ८६ हजार रुपये किमतीचा सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ यांच्यासह पोलीस अमलबजावणी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत चलाखीने केलेल्या या चोरीचा जुना राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केल्याने व्यापारी वर्गातून पोलिसांचे आभार मानले जात आहेत.