साठ्ये महाविद्यालयातील राड्यावर अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा; ‘मुलींचा हात धराल तर मार खाणारच'

साठ्ये महाविद्यालयातील राड्यावर अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा; ‘मुलींचा हात धराल तर मार खाणारच'

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील साठ्ये महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी जोरदार राडा झाला. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी अभाविपला इशारा दिला आहे. “तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणारच. अभाविपचे कार्यकर्ते मुलींचा हात धरून त्यांना घेऊन चालले होते. त्यामुळे त्यांनी आमचा मार खाल्ला. आमच्या नादाला लागू नका,” असे अमित ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

साठ्ये महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू होते. त्यावेळी हा राडा झाला होता. याबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटले की, मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू आहेत. अभाविपला कोणीही विद्यार्थी विचारत नाहीत. त्यामुळे मनविसेने सदस्य नोंदणी अभियान सुरू केले की हे नेहमी बाजूला स्टॉल लावतात आणि हात धुऊन घेतात.

महाविद्यालयाच्या आतमध्ये किंवा गेटवर स्टॉल लावू नयेत, असे सांगितले आहे. आम्ही बाहेर स्टॉल लावतो. मग तरीही अभाविपने गेटवर स्टॉल लावला. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते मुलींना हात धरून घेऊन चालले होते, असे मला कळाले. “तुम्ही मुलींचा हात धरल्यावर आम्ही मारणार. तुमची भाजपची संघटना आहे, जी भाजप सत्तेत आहे. तुम्ही विद्यार्थ्यांसाठी चांगली कामं करू शकता, ती करत नाही. त्यामुळे या गोष्टी करायची गरज पडते. मुलींवर हात टाकल्यावर तुम्हाला मारणारच,” असे अमित ठाकरे यांनी म्हटले.

अभाविप संघटनेला आता विद्यार्थ्यांमध्ये किंमत उरलेली नाही. जिकडे जिकडे तुम्ही राडा करणार, तिकडे मार खाणार तुम्ही. तुम्हाला काम करायचं नीट करा, आम्ही मध्ये येणार नाही. पण तुम्ही जबरदस्तीने कोणाला सभासद करत असाल तर आम्ही मध्ये पडणार. कोणत्याही विद्यार्थ्याला खेचून घेऊन जाऊ नका. ही भाजपची संघटना आहे. त्यांना काम करायचं तर किती केलं असतं. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कँटिन, स्वच्छतागृह असे कितीतरी प्रश्न आहेत. आम्ही एलफिन्स्टन, चेतना या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.