स्टेजवर भाषण करताना अमित ठाकरे अचानक थांबले; व्यासपीठ सोडलं, नेमकं काय घडलं?
मुंबई (प्रतिनिधी) : अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलत असताना ते अचानक थांबले. मला काय बोलायचं सुचत नाही.. मी पुन्हा येतो, असं म्हणत त्यांनी काही क्षणांसाठी व्यासपीठ सोडलं. काही वेळानंतर ते पुन्हा मंचावर आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपलं भाषण पूर्ण केलं. या घटनेची कार्यक्रमस्थळी मोठी चर्चा रंगली.

या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भाषणात अमित ठाकरे म्हणाले, ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि केंद्रातला राजीनामा घेतला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर कदाचित राजकारणात आलो नसतो. हे मी जाणूनबुजून सांगतो. राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, तर ते प्रामाणिक आहेत म्हणून त्यांचा अभिमान वाटतो. तुमच्यासारखे सहकारी नसते, तर मी राजकारणात टिकू शकलो नसतो.
ते पुढे म्हणाले, आपण केलेली आंदोलने विसरून आता नव्या प्रश्नांवर लढायला हवं. राज्याची परिस्थिती गंभीर आहे. मला काय बोलायचं सुचत नाही.. मी पुन्हा येतो,असं म्हणत ते काही वेळासाठी व्यासपीठावरून खाली उतरले.
पुन्हा मंचावर आल्यानंतर त्यांनी वातावरण हलकं करत सांगितलं, मी पाठ करून आलो नव्हतो. तुम्हा सर्वांना पाहूनच धडकी भरली. आता पुढे काय करायचं, यावर लक्ष केंद्रित करा. गेल्या आठवड्यात आपण विद्यार्थ्यांना व्हॅनमधून बाहेर काढत होतो. माझ्यातला आत्मविश्वास तुमच्या ताकदीमुळे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळेच आहे.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी काही नेत्यांवरही टीका केली. चार वर्षे त्रास द्यायचा आणि शेवटच्या वर्षी मलम लावायचं, ही पद्धत बदलली पाहिजे. ज्यांना तुम्ही मतदान करता, त्यांनी काम केलं नाही तर त्यांना बदलण्याची ताकद जनतेत आहे, असं ते म्हणाले.
शेवटी सदस्य नोंदणी अभियानाचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं, आजपासून सदस्य नोंदणीला सुरुवात होतेय. प्रत्येक विद्यार्थ्याला भेटायचं आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राजसाहेब घडवतील, पण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी विद्यार्थी संघटना उभी करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे.




