NTA ची मोठी कारवाई; पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी, परीक्षा पद्धतीत मोठे बदल
मुंबई (प्रतिनिधी) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी NTA ने मोठी कारवाई केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या परीक्षा विभागाची पुनर्रचना केली असून, यात 600 तज्ज्ञांना हटवून त्यांच्या जागी नवीन तज्ज्ञांची नियुक्ती केल्याची माहिती आहे. दरम्यान, NTA चे नवीन कार्यालय मिंटो रोड येथे असणार असून, सुरक्षाही अधिक मजबूत केली जाणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी, 18 ऑगस्ट रोजी NTA सोबत बैठक घेतली. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा आणि संबंधित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशांनुसार NTA च्या महासंचालकांनीही एजन्सीने केलेल्या कार्यवाहीचा तपशील दिला.
NTA ने सांगितले की, 600 तज्ज्ञांच्या जागी नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करून परीक्षा पथकाची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांची छाननी अधिक मजबूत करण्यासाठी चार-स्तरीय प्रश्नपत्रिका तपासणी प्रणाली लागू केली जाणार आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यांत 20 ते 25 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. भविष्यातील भरती योजनेचाही आढावा घेण्यात आला आहे.
याशिवाय, NTA ची कार्यालये युद्धपातळीवर नवीन ठिकाणी स्थलांतरित केली जाणार असून, तिथे CISF पथकांद्वारे सुरक्षा अधिक मजबूत केली जाणार आहे.
यापूर्वी सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी प्रल्हाद जोशी यांनी NTA च्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यांनी सर्व परीक्षा प्रक्रियांचे सर्वसमावेशक ऑडिट करण्याचे निर्देश दिले. एजन्सीने परीक्षा प्रणालीच्या प्रत्येक टप्प्याचा आढावा घेणे, त्यातील त्रुटी ओळखणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी उचललेल्या पावलांचा अहवाल तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे सचिव, NTA चे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सोमवारी झालेल्या बैठकीत NTA ने 50 हून अधिक कर्मचारी हटवण्याची घोषणाही केली. 10 नवीन व्यावसायिक पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या असून, भरती प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स, प्रश्नपत्रिकेची रचना आणि इतर विशेष क्षेत्रांसाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना आणले जात आहे.
प्रश्नपत्रिकांमध्ये विसंगती आढळल्यानंतर इंग्रजी, समाजशास्त्र आणि वाणिज्य विषयांची UGC-NET परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याची घोषणा एजन्सीने रविवारी, 16 ऑगस्ट रोजी केली होती. त्यानंतर NTA कडून हे मोठे बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे.




