हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे-अयुष म्हात्रे द्या; CSKच्या मोठ्या ट्रेडची चर्चा

हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे-अयुष म्हात्रे द्या; CSKच्या मोठ्या ट्रेडची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल (IPL) जगतातून सध्या एक अतिशय खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चा आता एका मोठ्या वळणावर आल्या आहेत. गेल्या हंगामात पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांना फारसा रुचला नव्हता, आणि संघाच्या सुमार कामगिरीमुळे या वादात आणखी भर पडली. आता भारताचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ याने हार्दिक पांड्याबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी 'ट्रेड' सुचवली आहे.

सुब्रमण्यम बद्रीनाथने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात एका मोठ्या खेळाडूंच्या अदलाबदलीचा (Trade) प्रस्ताव मांडला आहे. बद्रीनाथच्या मते, जर मुंबईला हार्दिकला संघातून रिलीज करायचे असेल, तर त्यांनी थेट चेन्नई सुपर किंग्ससोबत करार करावा. बद्रीनाथ म्हणाला की, "जर मी मुंबई इंडियन्सच्या जागी असतो, तर हार्दिक पांड्याला चेन्नईत पाठवून, त्याच्या बदल्यात शिवम दुबे आणि युवा आयुष म्हात्रे या दोन खेळाडूंना मुंबईच्या संघात सामील करून घेतले असते."

बद्रीनाथने फक्त खेळाडूंच्या अदलाबदलीचा सल्ला दिला नाही, तर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाबाबतही एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्या मते, हार्दिक पांड्या जर चेन्नईत आला, तर संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पांड्या ही त्रिमूर्ती चेन्नई ब्रँडला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल.

तसेच, संजू सॅमसनलाच कर्णधार बनवले पाहिजे असा कोणताही नियम नाही. जर हार्दिकने कर्णधारपदाची मागणी केली, तर चेन्नईने त्याला कर्णधार बनवण्यास हरकत नाही, कारण हार्दिक पांड्याचे एमएस धोनीसोबतचे संबंध चांगले आहेत. हार्दिकमध्ये अजूनही किमान 3 हंगाम खेळण्याची क्षमता असून तो चेन्नईच्या संघाला एक जबरदस्त संतुलन मिळवून देऊ शकतो, असा विश्वास बद्रीनाथने व्यक्त केला.

एका वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सने आधीच हार्दिक पांड्याला संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खालावल्याने आणि अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने फ्रँचायझी आता नवीन पर्यायांचा विचार करत आहे. चेन्नई सुपर किंग्स ही अशी फ्रँचायझी आहे जी खेळाडूंची प्रतिमा सुधारण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे हार्दिकसाठी देखील चेन्नईत जाणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

जर हा ट्रेड प्रत्यक्षात आला, तर आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अदलाबदल ठरेल. मुंबईला शिवम दुबेच्या रूपाने एक धडाकेबाज फिनिशर आणि आयुष म्हात्रेच्या रूपाने एक उदयोन्मुख मुंबईकर खेळाडू मिळेल. तर दुसरीकडे, चेन्नईला हार्दिक पांड्यासारखा अनुभवी अष्टपैलू आणि संभाव्य कर्णधार मिळेल. आता आगामी काळात चेन्नई आणि मुंबई या दोन्ही फ्रँचायझी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.