अभिनेता विजय थलपतींचा सिनेसृष्टीला कायमचा राम राम ; नेमकं कारण काय..?

अभिनेता विजय थलपतींचा सिनेसृष्टीला कायमचा राम राम ; नेमकं कारण काय..?

मनोरंजन विश्व - तामिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय थलपती यांचा चाहतावर्ग अफाट आहे. त्यांच्या एका झलकसाठीही चाहत्यांची गर्दी उसळते. केवळ अभिनेता म्हणून नव्हे, तर आता राजकीय नेते म्हणूनही विजय थलपती चर्चेत आहेत. त्यांनी ‘तमिळगा वेत्री कळघम’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली असून ऑगस्ट 2024 मध्ये पक्षाचा झेंडा आणि चिन्ह अधिकृतपणे सादर करण्यात आले आहे. विजय थलपती यांनी सिनेसृष्टीतून निवृत्त होण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. ते यापुढे पूर्णवेळ राजकारणात सक्रिय राहणार असून, ‘जन नायकन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम मलेशियात पार पडला. याच कार्यक्रमात त्यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा म्हणण्याचा निर्णय जाहीर केला.

‘जन नायकन’ या चित्रपटात विजय थलपती मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 27 डिसेंबर रोजी क्वालालंपूरमधील बुकिट जलील स्टेडियममध्ये झालेल्या ऑडिओ लाँच कार्यक्रमाला सुमारे एक लाख चाहत्यांची उपस्थिती होती. मलेशियात श्रीलंकेनंतर सर्वाधिक तामिळ लोकसंख्या असल्याने हा कार्यक्रम विशेष गाजला. कार्यक्रमादरम्यान विजय थलपती भावूक होऊन म्हणाले, मी जेव्हा सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं, तेव्हा वाटलं होतं की मी फक्त वाळूचा एक छोटा किल्ला उभारत आहे. पण तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासाठी राजवाडा उभा केला. चाहत्यांनी मला घडवलं, म्हणूनच आता त्यांच्या भविष्यासाठी मी एक किल्ला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या प्रेमासाठीच मी सिनेमा सोडत आहे.

विजय थलपती यांनी मलेशियन चाहत्यांचे विशेष आभार मानले. यशस्वी होण्यासाठी मित्र असायलाच हवेत असं नाही, पण एक मजबूत शत्रू असणं गरजेचं असतं. तो तुम्हाला अधिक बलवान बनवतो. 2026 मध्ये स्वतःला ओळखा आणि नव्या बदलासाठी सज्ज व्हा. धन्यवाद मलेशिया, असेही ते म्हणाले.