गडहिंग्लज मधील जि.प.च्या आढावा बैठकीत नागरिकांनी मांडल्या समस्या, प्रशासन सतर्क
कोल्हापूर ( प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती देत शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत का, याची प्रत्यक्ष पाहण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी एक धडाकेबाज आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार “एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!” या संकल्पनेतून अध्यक्षानीं आता प्रत्येक तालुक्यात जाऊन विकासकामांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा थेट आढावा घेण्यास सुरवात केली आहे.

या विशेष उपक्रमाची सुरुवात मंगळवारी गडहिंग्लज तालुक्यातून झाली. पहिल्याच दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावपातळीवरील विविध समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात चांगलीच हालचाल निर्माण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी विभागाकडे गावांमध्ये वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नसबंदी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच डीआरडीए विभागाकडे घरकुल पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ता व ध्येयरक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी करण्यात आली. अनेक नागरिकांनी सोलर जोडणीसाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची कामे अधिक प्रभावीपणे व्हावीत, कचरा उठाव नियमित व्हावा आणि संबंधित कंपनीला कठोर सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी प्रकल्प संचालिका माधुरी परीट यांनी कचरा उठावाची प्रक्रिया अधिक नियमित करण्यात येईल, असे सांगितले .
ग्रामपंचायत विभागाकडे अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांची मोठी कमतरता असल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. प्रत्येक गावाला स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी देऊन रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर प्रशासनाने लवकरच सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी अध्यक्षा शिल्पा खोत यांनी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.




