डीकेटीईमध्ये अत्याधुनिक ५ जी लॅबचे उद्घाटन ; संशोधन - नवतंत्रज्ञानाला नवी चालना
इचलकरंजी (प्रतिनिधी) - वेगाने बदलणा-या तंत्रज्ञान युगात संशोधनाला चालना देणा-या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात अदययावत अशा ५ जी लॅबचे उदघाटन करण्यात आले. रिलायन्स जिओ इनोव्हेशन आणि क्वॉलीटी अॅश्युरन्स लॅब, मुंबई चे असिस्टंट व्हाईस प्रेझिडंट आणि हेड डॉ मुनीर सय्यद यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुनीर सय्यद यांनी प्राध्यापकांशी विविध विषयांवर संवाद साधत उच्च दर्जाच्या संशोधनासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने संशोधनासाठी योग्य समस्या ओळखणे, अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक व नव्या शिक्षण पध्दतींचा अवलंब करणे, ब्लूम्स टेक्नॉलॉजी आधारित शिक्षण पध्दती विकसित करणे तसेच उदयोगांच्या गरजेनुसार नविन टेक्निकल कन्सेप्टशी संबंधीत गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. अंतिम वर्षातील प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व समाजउपयोगी संशोधन करावे असे आवाहनही त्यांनी केले.५ जी, ६ जी तंत्रज्ञान व त्यामधील ए.आय.चा प्रभाव, तसेच ए.आय.मुळे विविध क्षेत्रांत होणारे परिवर्तन आणि भविष्यातील रोजगारच्या संधी कशा बदलतील, याबददल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विकसित केलेले ५ जी आधारित प्रकल्प पाहून त्यांनी विशेष प्रशंसा केली. लॅबची अत्याधुनिक रचना, उपलब्ध सुविधा व संशोधनासाठी होणारा प्रभावी वापर याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
या ५ जी लॅबमध्ये ड्रोन्स, मिड बँड स्टॅण्ड अॅलोन सिस्टीम,५ जी सीम, डोंगल्स, आयओटी गेटवे, राउटर, एआर/व्हीआर कीट, आणि अॅपलिकेशन सर्व्हरचा समावेश असून लॅबच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापन डॅशबोर्ड यांसारख्या आधुनिक साधनसामग्रीचा समावेश आहे. शेती,वस्त्रोद्योग,शैक्षणिक,आरोग्य,वाहतूक, ए.आय. व आयओटी अशा विविध क्षेत्रांतील संशोधन, प्रयोग व प्रकल्पांसाठी ही लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. भारत सरकारच्या ५ जी लॅब योजनेअंतर्गत ही सुविधा डीकेटीईला उपलब्ध झाली आहे.
या लॅबमुळे विद्यार्थ्यांना ५ जी टेक्नॉलॉजीची सखोल ज्ञान मिळून संशोधनवृत्ती विकसित होणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक व व्यावसायिक विकासाला निश्चितच नवी दिशा मिळण्यास होणार आहे. या लॅबच्या स्थापनेसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, सर्व विश्वस्त संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे व इटिसी विभागप्रमुख प्रा.डॉ. एस.ए.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर या ५ जी लॅबसाठी प्रा.डॉ.ए.आर.पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.




