नेत्यावरचे आरोप नगरसेवकांनी अंगावर घेऊ नयेत - प्रा. जयंत पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) - काँग्रेस चे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण हे स्थायी समिती सभापती असताना थेट पाईपलाईन योजनेला मंजूरी दिली गेली. त्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये या योजनेचा प्रस्ताव कोणितीही 'महत्वपूर्ण आणि तांत्रिक' चर्चा न करता केवळ ३ मिनीटात मंजूर करण्यात आला. त्यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांची घालमेल मी प्रत्यक्ष पाहिली आहे त्यामुळे आमचा नगरसेवकांवर कोणताही आक्षेप नसल्याचं वक्तव्य प्रा. जयंत पाटील यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, 'माझा वैयक्तिक ड्रिम प्रोजेक्ट आहे' असे सांगून ज्यांनी सदस्यांना या पध्दतीने प्रस्ताव मान्य करायला लावला. त्यांच्यावर केलेले आरोप, या नगरसेवकांनी आपल्यावर ओढवून घेऊ नयेत. त्याच बरोबर ज्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांना चर्चा करावयास अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही कसबा बावड्यातील हनुमान मंदिरात चर्चेला आणि शपथ घेण्यासाठी यायला तयार आहोत.

प्रा. जयंत पाटील पुढे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी व भाजपा - ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी एक पत्रकार परिषद घेऊन थेट पाईपलाईन योजना कशी कुचकामी ठरत आहे हे तांत्रिक माहितीसह स्पष्ट केले होते आणि जे या योजनेला स्वतः चा ड्रिम प्रोजेक्ट म्हणवून घेत होते त्या आ. सतेज पाटलांनी, ऐन सणासुदीच्या काळात पाण्याविना अक्षरशः रडकुंडीला आलेल्या जनतेची माफी मागावी आणि या प्रकल्पामध्ये काही काळबेरे नाही हे मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे असे आव्हान केले होते. त्यावर ते आरोप ज्यांच्यावर केले ते काहीच बोलत नाहीत, उलट नगरसेवकांना पुढे करत आहेत हे योग्य नाही.
सचिन चव्हान स्थायी समिती सभापती असताना जरी योजनेला मंजूरी मिळाली तरी त्यात त्यांचा काहीही सहभाग नाही याची आम्हाला माहिती आहे. त्यांच्या स्वभावानुसार 'कोणतीही' चर्चा न होता प्रस्ताव मंजूर करावा लागल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ होते याचीही आम्हाला जाणीव आहे. पण नेत्याच्या संरक्षणासाठी नगरसेवकांना दाणीला देणे योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांनी आमचे आव्हान स्विकारावे आणि चर्चेला यावे. त्यासाठी त्यांना जर अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही आमच्या नेत्यांसोबत बावड्याच्या हनुमान मंदिरात यावयास तयार असल्याचंही प्रा. जयंत पाटील म्हणाले.




