प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावुया- जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत

प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावुया- जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत

कोल्हापूर (प्रतिनिधी): सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातूनच घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे. यासाठी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा स्तरीय कार्यशाळेचे आयोजन राजर्षी शाहू छत्रपती सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या कार्यशाळेचे उद्घाटन अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, डॉ. जॅसमिन, मुख्य कार्यकारी अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालुन करणेत आले.

यावेळी सभापती बांधकाम व आरोग्य समिती सारीका नांदेकर, सभापती समाज कल्याण समिती श्रध्दा गायकवाड, जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

घनकचरा व्यवस्थापन फक्त ग्रामस्थांची जबाबदारी नाही तर लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या समन्वयाने गाव स्तरावर काम केल्यास यामध्ये निश्चितच यश मिळेल असे उपाध्यक्ष  तानाजी पाटील यांनी सांगीतले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी कचरा व्यवस्थापनाच्या सोप्या आणि कमी खर्चिक पद्धती व पर्याय ग्रामस्थांपर्यंत पोहचविल्यास गावे नक्कीच स्वच्छ व कचरामुक्त होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगीतले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन, घनकचरा व्यवस्थापन संदर्भातील नवीन घनकचरा व्यवस्थापन 2026 मार्गदर्शक सूचना, नियम तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, बँकिंग, सहकारी व खाजगी आस्थापनांनी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्त्रोत पातळीवर वर्गीकरण करून वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करणे याबाबत घेतलेला निर्णय या विषयांची माहिती देणेसाठी या जिल्हा स्तरीय कार्यशाळेचे अयोजन करणेत आले होते.

कार्यशाळेच्या सुरुवातीला, घनकचरा व्यवस्थापन 2026 मार्गदर्शक सुचना व नियमावली या विषयाबाबत माधुरी परीट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता यांनी यावेळी सादरीकरण केले.

जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत "कचरामुक्त जिल्हा परिषद (Zero-Waste ZP)" हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद कार्यालयामध्ये "तीन डबा प्रणाली" (पांढरा, हिरवा, लाल) तसेच ई-वेस्ट व सॅनिटरी वेस्टसाठी स्वतंत्र कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत अनिकेत नगरकर (CM Fellow) यांनी सादरीकरण केले.

यावेळी "कचरामुक्त जिल्हा परिषद (Zero-Waste ZP)" हा अभिनव उपक्रमाच्या माहिती पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करणेत आले.

तसेच कार्यशाळेमध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट काम केलेले ग्रामपंचायत अधिकारी  संजय शिंदे, ग्रा.पं. निगवे दु, तालुका करवीर, सुरेखा आव्हाड, ग्रा.पं. शेळकेवाडी, तालुका करवीर व गीता कोळी, ग्रा.पं. संभापूर, तालुका हातकणंगले यांनी सादरीकरण केले.