भाजपच्या पक्षविस्तारामुळे शिंदेसेनेत नाराजी ; मुख्यमंत्र्यांनी केली चांगलीच कानउघाडणी
मुंबई - महाराष्ट्रातील महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा घटक दल असल्याने त्यांचा वेगाने सुरू असलेला पक्षविस्तार शिंदेसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिंदेसेनेचा प्रभाव असलेल्या अनेक भागांत भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना गळाला लावण्याचा वेग वाढवला असून यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद आजच्या कॅबिनेट बैठकीत उमटले. शिंदेसेनेच्या सर्व मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांनी सेनेच्या मंत्र्यांना चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपने शिंदेसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या पक्षात सामील करून घेत असल्याचा शिंदेसेनेचा आरोप आहे. ज्यांच्याविरोधात त्यांनी निवडणुका लढवल्या, त्याच नेत्यांना भाजपने पक्षप्रवेश दिल्याने सेनेत नाराजी वाढली आहे. ‘युतीचा धर्म पाळला जात नाही,’ अशी तक्रार शिंदेसेनेने केली आहे. तसेच निधी मिळवण्यासाठी आमदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सेनेचे म्हणणे आहे.
कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर-कुळगाव या ठिकाणी भाजपने शिंदेसेनेचे अनेक माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेतल्याने शिंदेसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उलटपक्षी शिंदेसेनेलाच सुनावले. “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही केलं तर चालतं, पण भाजपने केलं तर चालत नाही असं होणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यापुढे एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश न देण्याचे पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगितले. “तुम्ही नियम पाळणार असाल तर भाजपही पाळेल,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. कल्याण-डोंबिवली भागात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोठी वैचारिक ताकद दाखवली असून अनेक माजी शिवसेना नगरसेवक त्यांच्या गळाला लागले आहेत.
दरम्यान, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत नाराजी नसल्याचा दावा केला. नगर पंचायत व नगर परिषद निवडणुकांसाठी नामांकन छाननी सुरू असल्याने अनेक मंत्री आपल्या जिल्ह्यांत असल्यामुळेच कॅबिनेटला गैरहजर राहिले, असे त्यांनी सांगितले. भाजपचे आठ मंत्री तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री बैठकीला अनुपस्थित होते आणि त्यांनी याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना आधीच दिल्याचेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.




