भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा प्रायोजक; अपोलो टायर्ससह 2027 पर्यंत करार
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकपदासाठी अपोलो टायर्स या नामांकित कंपनीची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) अपोलो टायर्ससोबत 2027 पर्यंतचा करार जाहीर केला असून, याअंतर्गत कंपनी प्रत्येक सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये देणार आहे. यापूर्वी हे प्रायोजकत्व ड्रीम 11कडे होतं, जे प्रति सामना 4 कोटी रुपये देत होतं. ड्रीम 11 ला जर्सी प्रायोजकपदावरून हटवण्यामागे भारत सरकारने लागू केलेला "ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन अॅक्ट 2025" हा मोठा कारणीभूत ठरला. या कायद्यानुसार, ऑनलाइन गेमिंगशी संबंधित कंपन्यांना अशा प्रकारच्या प्रायोजकतेपासून दूर ठेवण्याचे निर्देश आहेत.

बीसीसीआयने नव्या जर्सी प्रायोजकासाठी निविदा मागवताना स्पष्ट अट घातली होती की, कोणतीही इच्छुक कंपनी किंवा तिच्याशी संबंधित संस्था ऑनलाइन मनी गेमिंग, बेटिंग किंवा जुगाराशी संबंधित नसावी. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर ठरवण्यात आली होती.
दरम्यान, आशिया कप 2025 साठी भारताला यजमानपद मिळालं असलं तरी, भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हा स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. टी - 20 आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाला गट - अ मध्ये स्थान देण्यात आलं असून, या गटात भारत, पाकिस्तान, यूएई, आणि ओमान हे संघ आहेत.
आशिया चषक 2025 साठी भारतीय संघाची घोषणा -
कर्णधार: सूर्यकुमार यादव
फलंदाज: शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग
अष्टपैलू: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल
यष्टीरक्षक: जितेश शर्मा, संजू सॅमसन
गोलंदाज: जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा




