वित्तीय शिस्तीचे पालन करूनच शेंडा पार्कातील बांधकामे - बांधकाम विभागाचा खुलासा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेंडा पार्क परिसरातील विविध विकासकामे शासन नियम, पारदर्शकता, वित्तीय शिस्त यांचे काटेकोर पालन करून केली जात आहेत, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. तोंदले यांनी प्रसिद्धिपत्रकातून दावा केला आहे.शेंडा पार्कातील वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकाम आणि रस्ते प्रकल्पात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अधिकारी, ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन बु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड यांनी दिले होते. त्यांनी तांत्रिक पुरावे देऊन गंभीर आरोप केले होते. त्यावर तोंदले यांनी खुलासा केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रचलित नियमावलीनुसार प्रक्रीया असल्याचा दावा खुलासा पत्रकात म्हटले आहे, शेंडा पार्क परिसरातील कामांना सन २०२४-२५ आर्थिक वर्षात प्रशासकीय मान्यता मिळाली. उपभोक्ता विभागाच्या मागणीनुसार इमारतींचे सविस्तर आराखडे, मांडणी नकाशे (ले-आउट) तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रचलित नियमावलीनुसार तांत्रिक मान्यता आणि अंदाजपत्रक सादर करून मंजुरी घेण्यात आली. प्रचलित ई-निविदा प्रक्रियेप्रमाणे पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पाच विविध इमारतीचे बांधकाम करणे, निवासी डॉक्टर्स पुरुष, महिला, मुले, मुली, परिचारिकांसाठी वसतिगृह, परिचारिका प्रशिक्षण केंद्र बांधणे, सपाटीकरण, सुशोभीकरण करणे, फॉरेन्सिक विभागाची इमारत बांधणे, बास्केटबॉल आदी कामे गुणवत्तापूर्वक करण्याचे नियोजन आहे.




