शुभमन गिलने 'या' विक्रमात सचिन अन् विराटला टाकलं मागं केली दमदार कामगिरी

शुभमन गिलने 'या' विक्रमात सचिन अन् विराटला टाकलं मागं केली दमदार कामगिरी

मुंबई - एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही आतापर्यंतचे सर्वाधिक यशस्वी फलंदाज मानले जातात. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर कोहलीकडे सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. आता भारतीय संघाचा युवा फलंदाज आणि उपकर्णधार शुभमन गिलदेखील या दिग्गजांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतो आहे. गिलने वनडे क्रिकेटमध्ये आपल्या सुरुवातीच्या 55 सामन्यांत धावांच्या बाबतीत कोहली, सचिन आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज हाशिम अमलालाही मागे टाकले आहे.

गिलने 55 एकदिवसीय सामन्यांत 2775 धावा केल्या असून त्याचा सरासरी 56.63 आहे. याच कालावधीत त्याने 8 शानदार शतके झळकावली आहेत. भारतासाठी अनेक वेळा महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गिलची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.

विराट कोहलीने आपल्या पहिल्या 55 वनडे सामन्यांत 42.9 च्या सरासरीने 2059 धावा आणि 5 शतके केली होती. तर सचिन तेंडुलकरने पहिल्या 55 सामन्यांत 31.76 च्या सरासरीने 1556 धावा केल्या होत्या आणि त्यावेळी एकही शतक झळकावले नव्हते. हाशिम अमलाने आपल्या पहिल्या 55 सामन्यांत 55.37 च्या सरासरीने 2713 धावा केल्या होत्या, पण आता हा विक्रम शुभमन गिलने मोडीत काढला आहे.

या कामगिरीमुळे शुभमन गिलचा उदय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा पुढचा दिग्गज फलंदाज म्हणून सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.