स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या जलव्यवस्थापन समिती सभेत अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या सूचना
कोल्हापूर (प्रतिनिधी): जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व गावांना तसेच वाड्यावर नियमित स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जल व्यवस्थापन समितीच्या सभेत संबंधित विभागाला जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी दिल्या.

अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व समिती सदस्य यांच्या निवडीनंतरची जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची पहिली सभा आज शुक्रवार सभापती जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय वसंतराव नाईक समिती सभागृहात झाली.
पाणीटंचाई निवारण पुरवणी आराखडा यादीमध्ये जि. प. सदस्यांनी सुचविलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा समावेश करावा याबाबत उपाध्यक्ष तानाजी पाटील सदस्य अरुण जाधव, मानसी भोगण यांनी विषय मांडला.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्या कामाची मुदत संपूनही योजना पूर्ण होत नसतील तर संबंधित योजनेच्या कंत्राट दराला काळ्या यादीत टाकण्याची अथवा दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत उपाध्यक्ष तानाजी पाटील व सदस्य संग्राम पाटील यांनी प्रश्नउपस्थित केला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व्यक्तिगत शौचालय लाभार्थ्यास शौचालय पुनर्बांधणी करता प्रोत्साहन पर निधी मिळणेकामी पाठपुरावा करण्याची मागणी सदस्य अरुण जाधव, राजकुंवर गायकवाड यांनी केली.
त्याचबरोबर या सभेत इतर सदस्यांनी मनरेगा अंतर्गत आनंद रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घ्यावी तसेच नवीन विहीर योजनेमध्ये जुन्या विहिरीतील गाळ काढणे व विहिरीची दुरुस्ती करणे या बाबींचा समावेश करणेबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवावे. पावसाळा सुरू होणार असल्याने नळ पाणीपुरवठा योजनेच्या कनेक्शनचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी.
सामाजिक वनीकरण विभागाने ज्या त्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार रोपवाटीकेमध्ये उपलब्ध असणारी रोपे पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतींना देण्यात यावी.कृषी विभाग, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ विभाग व वन विभाग यांचे अधिकारी सभेस गैरहजर असलेने त्यांच्या अनुपस्थिती बाबत त्यांना नोटीस देण्यात यावी.
जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी या मुद्द्यांवर सदस्या सुयशा घाटगे, सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांनी विषय उपस्थित केले.
या सभेस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




