अधिकाऱ्याने माझ्या प्रायव्हेट पार्टवर..." दिल्ली आंदोलनातील तरुणीच्या गंभीर आरोपांनी खळबळ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली: दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सीजेपीच्या (CJP) नेतृत्वात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी तरुण-तरुणींना निर्घृणपणे मारहाण केली आणि आंदोलकांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर केला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. या पत्रकार परिषदेत लाठीमारात जखमी झालेल्या तरुणांनी थेट माध्यमांसमोर येत पोलिसी अत्याचाराची धक्कादायक हकिकत सांगितली.

यावेळी 'मुस्कान शर्मा' नावाच्या तरुणीने केलेल्या गंभीर आरोपांनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
पुरुष अधिकाऱ्याने प्रायव्हेट पार्टवर मारण्याचा प्रयत्न केला: तरुणीचा दावा
पत्रकार परिषदेत आपबिती सांगताना मुस्कान शर्मा म्हणाली, "मी जंतर-मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलनात सहभागी झाले होते. तरीही आरएएफ (RAF) अधिकाऱ्यांनी माझ्यावर लाठीचार्ज केला. नियमानुसार लाठीचार्ज करताना मांड्यांच्या वर मारता येत नाही आणि कोणताही पुरुष अधिकारी महिला आंदोलकांवर थेट वार करू शकत नाही. परंतु, एका पुरुष अधिकाऱ्याने माझ्या प्रायव्हेट पार्टवर मारण्याचा प्रयत्न केला. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून हे कृत्य घडले, त्यांनी समोर येऊन माझी माफी मागावी."
"नाव मुस्कान असल्यामुळे मुस्लीम समजून शिवीगाळ"
आपल्या आडनावाचा आणि नावाचा उल्लेख करत ती पुढे म्हणाली, "माझे नाव मुस्कान असले तरी माझे आडनाव शर्मा आहे. मात्र, केवळ नाव ऐकून अनेकजण मला मुस्लीम समजतात आणि त्यामुळे मला अधिक शिवीगाळ केली जात आहे. देशात सध्या असा नेरेटिव्ह पसरवला जात आहे की, सरकारने विचारलेल्या प्रश्नांविरोधात बोलणारी व्यक्ती मुस्लीमच असली पाहिजे. एखादी व्यक्ती मुस्लीम असेल तर ती थेट देशद्रोही ठरते का?" असा उद्विग्न सवालही तिने उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकारावरून मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले असून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.




