अभिषेकचं वचन अन् मैदानात वादळ!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेच्या अंतिम सामन्यात अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने मैदान गाजवलं. विशेष म्हणजे, सामन्यापूर्वी त्याने संघातील खेळाडूंना दिलेला जोशपूर्ण संदेश आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.अभिषेकने आपल्या सहकाऱ्यांना,पंजाबी भाषेत म्हणाला “योद्धे कधीच दया दाखवत नाहीत. आज त्यांना अजिबात सोडायचं नाही. हा मालिकेतील शेवटचा सामना आहे. स्टेडियममधील प्रेक्षकांकडे पाहा आणि आज चाहत्यांचं पूर्ण मनोरंजन करा.

यानंतर मैदानात उतरलेल्या अभिषेकने आपल्या शब्दांना कृतीची जोड दिली. त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी करत अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक ठोकलं. त्याच्या या तुफानी खेळीमुळे सामना पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा रोमांच अनुभवायला मिळाला.सामन्याआधी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर मैदानातील तुफानी फलंदाजी यामुळे अभिषेक शर्माचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अभिषेकने आपल्या शतकाने केवळ खळबळच माजवली नाही, तर पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला. अभिषेकने एकहाती पहिल्या सहा षटकांत ७६ धावा ठोकत पोर्तुगालच्या कुलदीप घोलिया (७४) आणि ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड (७३) यांचे पॉवरप्लेमधील विक्रम मोडले.
आपल्या संपूर्ण खेळीत, अभिषेकने नऊ चौकार आणि ११ षटकारांसह ३१७.६५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने एकूण ३४ चेंडूंचा सामना करत १०८ धावा केल्या. या कामगिरीने त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडला, जो त्याने २०१७ मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूंमध्ये केला होता. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील तिसरा सर्वात जलद शतकवीरही ठरला.




