आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती; १०२ रुग्णवाहिकेसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रम सुरू
मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही आणि पारदर्शक करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रम हा त्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्याला आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) रवींद्र सावंत, उपसंचालक जयंत मुळे, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संचालक विजय कंदेवाड, राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) चे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये व आरोग्यमंत्र्यांचे मार्गदर्शन
पारदर्शकता आणि वेग: शासकीय वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे इंधन खरेदी व्यवस्थापनात आर्थिक पारदर्शकता येईल आणि कामकाजातील अनावश्यक विलंब टाळता येईल.
रुग्णवाहिकांचे व्यापक वितरण: एचपीसीएलच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत राज्यातील एकूण ३,१९५ रुग्णवाहिकांना ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ दिले जाणार आहेत.
१०२ रुग्णवाहिकेचा विस्तार: यापूर्वी १०२ रुग्णवाहिकेची सेवा केवळ माता व बालकांसाठी होती; मात्र यापुढील काळात ही सेवा सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून, १०८ रुग्णवाहिकेला एक प्रभावी पर्यायी व्यवस्था म्हणून ही यंत्रणा काम करेल.
उत्कृष्ट आपत्कालीन सेवा: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी मॉनिटरिंगच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन
कोरोनासारख्या संकटाच्या काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची आठवण करून देत, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सेवाभावाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन मंत्र्यांनी केले. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य आयुक्त, आयटी विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.




