अखेर मान्सूनचे आगमन मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी ; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

अखेर मान्सूनचे आगमन मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी ; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत अखेर मान्सूनने जोरदार आगमन झाले असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुंबईत सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पाऊस सुरू असून काही भागांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील 24 ते 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, 24 ते 27 जून या कालावधीत कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि नाले तुडुंब भरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातही रिमझिम पाऊस सुरू असून माणगाव, महाड, म्हसळा आणि पोलादपूर भागांत हलक्या सरी कोसळल्या.सिंधुदुर्गात गेल्या 24 तासांत सरासरी 80.87 मिमी पावसाची नोंद झाली असून देवगड तालुक्यात सर्वाधिक 126 मिमी पाऊस झाला. रत्नागिरीतील दापोली परिसरातही दमदार पावसामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.