उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी; माघारीनंतर बाळ मानेंचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. आज निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून, याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. यातच कोकण राजकीय वर्तुळातून एक सर्वांत मोठा आणि धक्कादायक 'ट्विस्ट' समोर आला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. बाळ माने यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे कोकण विधानपरिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने बाळ माने यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, ऐनवेळी बाळ माने यांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील संपूर्ण रंगत संपली असून, अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाळ माने पुढे म्हणाले की, नारायण राणे साहेबांसोबत माझे संबंध होते. लोकसभेत मी त्यांचे काम केले. विधानसभेत महायुतीच्या जागा वाटपात मला जागा मिळाली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली. उद्धव साहेब, रश्मीताई, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत या सर्वांनी माझा मान सन्मान राखला. मला उपनेता म्हणून त्यांनी जबाबदारी दिली. या निवडणुकीला फॉर्म भरताना देखील उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी मला मार्गदर्शन केले. आमदार दळवी यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीत मताचे विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल, असा माझा अंदाज होता. परंतु त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्यांच्या मताचे विभाजन होणार नाही, असे दिसून आले, असेही ते म्हणाले. तर राणेसाहेबांनी सांगितले तर पुन्हा घर वापसी करणार का? याबाबत विचारले असता बाळ माने म्हणाले की, राजकारणात जर आणि तर याला काही अर्थ नसतो. मी राजकारणात बार्गेनिंग केलं असतं तर खूप कमावले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.




