उद्धव ठाकरे वाट पाहत राहिले,आणि बाळ मानेंनी घेतला मोठा निर्णय! विनायक राऊतांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरे वाट पाहत राहिले,आणि बाळ मानेंनी घेतला मोठा निर्णय! विनायक राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्यात सामना अपेक्षित होता. मात्र, बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली.अर्ज मागे घेताना बाळ माने यांच्यासोबत मंत्री नितेश राणे उपस्थित असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. या निर्णयानंतर शिवसेना (ठाकरे गट) ने बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यांनी बाळ माने यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी बाळ माने यांच्यावर गंभीर आरोप केले. "उद्धव ठाकरे अडीच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज कायम राहावा यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, दुसऱ्या कुणालाही संधी मिळू नये यासाठी बाळ माने यांनी अर्ज मागे घेतला," असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

तसेच, बाळ माने यांनी केलेल्या आरोपांनाही विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. "बाळ माने यांची कार्यपद्धती आम्हाला नवीन नाही. त्यांनी यापूर्वीही वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण केल्याचा अनुभव आम्हाला आहे," असे राऊत म्हणाले.दुसरीकडे, बाळ माने यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करत काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली असून, यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत.या संपूर्ण घडामोडीमुळे कोकणातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.