एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल
पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा विविध खात्याच्या मंत्र्यांच्या कामकाजासाठी ओएसडींची नियुक्ती केली जाते. अनेकदा हे विशेष कार्यकारी अधिकारी ही खासगी सचिव म्हणून देखील कार्य करतात. अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची संख्या अधिक असल्याने अनेकजण त्या पदाचा धाक दाखवून शासकीय विभागात कामे करतात. मात्र, पुण्यात एका तथाकथित ओएसीडीचा भांडाफोड झाल्याचं समोर आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी (OSD) असल्याचे भासवून पुणे (Pune) पोलिसांची दिशाभूल करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न श्रीहरी पाटील वय 47,रा.हिंजवडी असे आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी (OSD) असल्याचे सांगत पुण्यातील परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश केला. पुणे पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तथाकथित ओएसडीला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




