कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ; शेतकऱ्यांना किती फायदा?

कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ; शेतकऱ्यांना किती फायदा?

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे. आता साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने काहीशी दिलासादायक आहे, कारण कांद्याला चांगला दर मिळाल्यास त्यांच्या पदरात चार पैसे अधिक पडू शकतात. मात्र, या वाढलेल्या दराचा किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होतो, हा खरा चिंतेचा विषय आहे. कारण सध्या अनेक शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. शेतकऱ्यांनी कांदा याआधीच विकला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे, त्यांनाच या वाढलेल्या दराचा फायदा होणार आहे. दरम्यान, अवघ्या एका आठवड्यात कांद्याच्या दरात 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सणासुदीच्या दिवसांपूर्वी साखरेच्या वाढत्या दरामुळे नागरिक चिंतेत असतानाच आता कांद्याचे भावही वाढू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत देशातील अनेक भागांत कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या कांद्याचा सरासरी किरकोळ भाव 40.72 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मात्र, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख महानगरांमध्ये कांदा 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरमध्ये कांद्याचे भाव 25 ते 30 रुपये प्रति किलोवरून 50 ते 60 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. किरकोळ विक्रेत्यांच्या मते, अवघ्या दोन दिवसांत कांद्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. कांद्याच्या दरातील या अचानक वाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम झाला आहे.

आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील लासलगावमध्येही केवळ एका आठवड्यात घाऊक दरात 30 ते 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. 21 ऑगस्ट रोजी कांद्याचा सरासरी किरकोळ भाव 40.79 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला. 21 जुलै रोजी हा दर 34.87 रुपये प्रति किलोग्राम होता. म्हणजेच केवळ एका महिन्यात कांद्याच्या दरात अंदाजे 17 टक्क्यांची वाढ झाली आहे.ही वार्षिक वाढ त्याहूनही मोठी आहे. 21 ऑगस्ट 2025 रोजी कांद्याचा सरासरी किरकोळ भाव 28.72 रुपये प्रति किलोग्राम होता. त्याच्या तुलनेत गेल्या वर्षभरात कांद्याच्या दरात 42 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

भारतात पेरणीला उशीर झाल्यामुळे नवीन खरीप कांद्याच्या पिकाची आवक लांबणीवर पडली आहे. त्यातच सणासुदीच्या दिवसांमुळे कांद्याच्या मागणीत वाढ झाली असून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावतही वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भाववाढीमुळे जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार सप्टेंबर महिन्यापासून आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याची योजना आखत आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या दरात काहीसा दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.