खासगी आराम बससेवेला 'लालपरी'ची दमदार टक्कर; एसटीच्या ताफ्यात येणार २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस
मुंबई: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रात नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित (A/C) व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये १७० आसनी (Seater) आणि ३० शयनयान (Sleeper) बसेसचा समावेश असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा
२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान ५ ते ६ तासांच्या प्रवासासाठी दिवसा आरामदायी ४५ आसनी बसेस चालवल्या जातील. तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडता येईल.
मोबाईलवरून तिकीट आरक्षण व डिजिटल सुविधा
या नव्या सेवेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेसह खासगी डिजिटल ट्रॅव्हल ॲप्सवरूनही तिकीट आरक्षित करण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांना घरबसल्या मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि आसनांची माहिती घेऊन आरक्षण करता येईल.
खासगी संस्थेकडून हॉस्पिटॅलिटी सेवा
बसमधील स्वच्छता, प्रवाशांचे स्वागत, मूलभूत सुविधा आणि ग्राहकसेवेचे व्यवस्थापन करण्यासाठी खासगी संस्थेच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना हाय-एंड आणि दर्जेदार आतिथ्यसेवेचा अनुभव मिळेल.
मागणी असलेल्या मार्गांचे सर्वेक्षण
महाराष्ट्र आणि आंतरराज्य मार्गांवर जिथे खासगी बसेसना अधिक मागणी आहे, अशा मार्गांचा सर्वंकष अभ्यास करून स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतरच या नव्या व्होल्वो बसेसचे मार्ग निश्चित करण्यात येणार आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आरक्षण आणि उत्तम ग्राहकसेवेच्या बळावर 'लालपरी' आता लांब पल्ल्याच्या प्रवासात एक नवा अध्याय सुरू करण्यास सज्ज झाली आहे.




