चौदा वर्षाच्या पोरानं धु धू धूतलं... वैभवच्या खेळाने बॉलिवूडसह क्रिकेट विश्व भारावले

चौदा वर्षाच्या पोरानं धु धू धूतलं... वैभवच्या खेळाने बॉलिवूडसह  क्रिकेट विश्व भारावले

मुंबई : आयपीएलच्या रंगतदार हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याने आपल्या वादळी खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात केवळ १४ वर्षांचा असलेल्या वैभवने अवघ्या ३८ चेंडूत शतक ठोकत धमाकेदार प्रदर्शन केलं. त्याने या खेळीत ११ षटकार आणि ७ चौकार मारले. विशेष म्हणजे त्याने केवळ १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि पुढे ३५ चेंडूत शतक गाठत आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला.

वैभवच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर केवळ क्रिकेट विश्वातच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील त्याचं कौतुक होत आहे. अभिनेता विकी कौशलने सोशल मीडियावर वैभवचा फोटो शेअर करत, "A Knock For The Edges... प्रचंड आदर" असे लिहिले आणि त्याला सलाम करत एक भावनिक पोस्ट केली.

क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माही वैभवच्या या तुफानी खेळीमुळे भारावून गेला. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर "क्लास" असं एकच शब्द वापरत वैभवच्या खेळीला दाद दिली.

या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ४ गडी गमावून २०९ धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सकडून वैभव आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात करून १६६ धावांची भागीदारी रचली. यशस्वीने ४० चेंडूत नाबाद ७० धावा केल्या, तर रियान परागने १५ चेंडूत ३२ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. राजस्थानने हा सामना फक्त १५.५ षटकांत ८ विकेट्सने जिंकत प्रेक्षकांची मने जिंकली.