छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगरावर दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही कोसळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगरावर दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही कोसळून मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एक अत्यंत ह्रदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. डोंगरावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांनाही आपले प्राण गमवावे लागले. कुणाल मुरलीधर चांदवडे, त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे अशी या दुर्दैवी मृत कुटुंबाची नावे आहेत.

घरगुती वादातून नैराश्यात आलेल्या कुणालने काल (२१ ऑगस्ट) सकाळी खवड्या डोंगराची वाट धरली. तो टोकाचे पाऊल उचलणार असल्याची कुणकुण लागताच त्याचे आई-वडील त्याला शोधत डोंगरावर पोहोचले. तिथे उपस्थित पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कुणालला सुखरूप खाली आणण्यासाठी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न केले. सुरक्षेसाठी खाली जाळी लावण्याचे नियोजनही सुरू होते; मात्र कुणाल सतत आपली जागा बदलत राहिला.

मुलाला वाचवण्यासाठी आईने जिवाच्या आकांताने त्याला विनवण्या केल्या. "तुला जगण्यात रस नसेल तर मी तुझ्या वडिलांना सोडून देते, आपले मंगळसूत्रही फेकून देते, पण तू टोकाचे पाऊल उचलू नकोस," असे आर्त उद्गार आई काढत होती. मात्र, "माझे कोणीच ऐकत नाही, माझ्या आयुष्याचे आता कोणतेच सॉल्यूशन नाही," असे म्हणत कुणालने अखेर डोंगरावरून उडी घेतली.

मुलाला हवेतच पकडण्याच्या किंवा ओढण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचा तोल गेला आणि तेही खाली कोसळले. आपल्या डोळ्यांसमोर पती आणि मुलगा खाली पडल्याचे पाहून तीव्र धक्क्याने आई संगीता यांनीही क्षणाचाही विलंब न लावता मागून खाली झेप घेतली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.