डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला ‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्कार ; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणात गेली तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला ‘बेस्ट इन्स्टिट्यूट इन मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे पार पडलेल्या ‘नवभारत हेल्थकेअर समिट २०२६’ मध्ये राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आणि सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला. या सोहळ्याला जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या जागतिक अध्यक्षा शायना एन. सी., अभिनेत्री हरनाज कौर संधू, ए. श्रीनिवास आणि ब्रजमोहन पांडे यांच्यासह वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराचे महत्त्व व आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक
वैद्यकीय सेवेतील उत्कृष्टता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि सर्वसामान्य जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या निरंतर व गुणवत्तापूर्ण कार्याचा विशेष गौरव केला.
वैद्यकीय क्षेत्रातील ३६ वर्षांची गौरवशाली परंपरा
- स्थापना व नेतृत्व: १९८९ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३६ वर्षांत देशास हजारो गुणवंत डॉक्टर्स दिले आहेत.
- आधुनिक सुविधा: अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंना मिळणारे प्रत्यक्ष अनुभवाचे शिक्षण यामुळे संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
- योगदान: राज्याची आणि देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात महाविद्यालयाचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.




