दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंचा दुरान्वयेही संबंध नाही; FIR नंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंचा दुरान्वयेही संबंध नाही; FIR नंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केली असून, या FIR मध्ये आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली आणि रिया चक्रवर्ती यांची नावे असल्याचा दावा दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 संजय राऊत म्हणाले की, "तुम्हाला माहित आहे की, या संपूर्ण विषयावर मी कधीही बोललो नाही. मी माझं मत व्यक्त केलं नाही. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. एका मुलीच्या चारित्र्याविषयीचा हा विषय आहे. तिच्या कुटुंबावर कोसळलेला आघात आहे. तिचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी वारंवार केला. मुंबई पोलिसांच्या इंटिग्रेटीवर शंका घेता येणार नाही."

 "महाराष्ट्रात आता शिवसेनेचं सरकार नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसून देवेंद्र फडणवीस आहेत. गृहमंत्रीही तेच आहेत. त्यांच्याच काळात या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन क्लोजर रिपोर्ट देण्यात आला. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात दुरान्वयेही संबंध नाही, असं सांगण्यात आलं. विरोधकांचं सरकार असताना मुंबई पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करून कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जे जे आरोप विरोधकांनी केले, त्या दिशेने तपास करण्यात आला. आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही, असा कोणताही पुरावा नाही," असे संजय राऊत म्हणाले.

 विरोधकांवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, "राजकीय हेतूने प्रेरित होऊन पुन्हा पुन्हा या विषयावर चर्चा केली जाते आणि त्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात आहेत. हा आता राजकीय आखाडा झाला आहे. या राज्याच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. हे षडयंत्र आहे. न्यायालयाने या प्रकरणात स्पष्टपणे सांगितलं आहे की, जोपर्यंत तपास होत नाही, तोपर्यंत कोणीही आरोपी आहे असं गृहित धरू नका. पण तरीही मी कालपासून पाहतोय की काही मीडिया मोठमोठ्याने ओरडत असून संशय निर्माण केला जात आहे. हे राजकीय षडयंत्र आणि राजकीय कारस्थान आहे."

 "ठाकरे कुटुंबाचं महाराष्ट्रात स्थान आहे. मराठी माणसाच्या हृदयात जे स्थान आहे, त्याला डाग लावण्याचा प्रयत्न दिल्लीच्या माध्यमातून सुरू आहे. मी इतकंच सांगेन, याही प्रकरणात बदनामीच्या मोहिमेविरोधात आम्ही लढत राहू," असे राऊत यांनी म्हटले.

 संजय राऊत पुढे म्हणाले की, डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याकरता सातत्याने दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे हा दबाव असू शकतो. महाराष्ट्रात अन्यायाविरोधात लढाई सुरू आहे आणि सातत्याने आदित्य ठाकरे केंद्रस्थानी आहेत. महानगरपालिकांतील विविध प्रकरणे ते बाहेर काढत असल्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

 तर शेवटी एक गंभीर आरोप करत राऊत म्हणाले, "16 पानांच्या FIR मधील एकच पान कसं बाहेर येतं? रविवारी सह्याद्री विश्रामगृहावर एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर दोन महान नेते एकाच गाडीतून एशियाटीक लायब्ररीत गेले. त्या बैठकीत आणि त्या प्रवासात जे ठरलं, त्यानुसार ही FIRची पानं लिहिली गेली आणि मग पानं बाहेर आलीत. मी कधीच आरोप करत नाही, मी वस्तुस्थिती आणि वास्तविकता सांगतो," असे त्यांनी म्हटले.