नितीन देसाईंच्या N.D. स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगसाठी 50 टक्के सवलत
मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनानंतर एन.डी. स्टुडिओच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओचा शासनाने यापूर्वीच ताबा घेतला होता. आता या स्टुडिओच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी स्वीकारली.

यानंतर रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत एन.डी. स्टुडिओच्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत स्टुडिओबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. एन.डी. स्टुडिओमध्ये शूटिंग आणि इतर बाबींसाठी 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. फिल्ममेकर्ससाठी ही नक्कीच आनंदाची बातमी म्हणता येईल.
कर्जतच्या खालापूर येथील एन.डी. स्टुडिओमध्ये शूटिंग आणि अन्य बाबींसाठी 50 टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या एन.डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी स्वीकारला. त्यानंतर स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीत चित्रपट निर्मितीला अधिक चालना देणे, निर्मात्यांसाठी चित्रीकरणाचा खर्च कमी करणे आणि एन.डी. स्टुडिओचा प्रभावीपणे विकास करणे, या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत चित्रीकरण आणि इतर बाबींमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.
कोणत्या गोष्टींवर सवलत लागू होणार?
एन.डी. स्टुडिओतील थीम पार्कच्या प्रवेश शुल्कावर सवलत दिली जाणार आहे.
चित्रीकरणासाठी येणारे निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक आणि इतर मान्यवरांसाठी उपलब्ध निवास व्यवस्थेवरही सवलत मिळणार आहे.
यासोबतच सांस्कृतिक पर्यटनालाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं आणि सर्वसमावेशक चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून एन.डी. स्टुडिओचा विकास करण्याच्या दृष्टीने पुढील काळात विविध उपक्रम राबवण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले आहेत.
सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "आपले नितीन देसाई यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्टुडिओवरील कर्ज आणि सुविधा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक निर्णय घेतला आहे. सर्व आर्थिक देणी देऊन सरकारने या स्टुडिओची मालकी घेतली आहे. या स्टुडिओच्या बाबतीत आर्थिक घडी व्यवस्थित करून चांगली व्यवस्था सुरू करण्यात आली आहे."
"राज्याच्या सिनेसृष्टीला अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चित्रिकरण आणणे आणि त्यातून स्थानिक कलाकार, कामगार तसेच सेवा क्षेत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. एन.डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणाच्या संख्येत वाढ होण्यासोबतच आपल्या राज्याला देशातील प्रमुख सिनेमा निर्मिती केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळवून देण्यास मदत होणार आहे," असं आशिष शेलार म्हणाले.




