पंकजा मुंडे बाजूला झाल्या तर धनंजय धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंची जहरी टीका
मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे म्हणाले, पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर हा (धनंजय मुंडे) सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेण्याची ताकद पंकजा मुंडेंमध्ये आहे. त्या बाजूला झाल्या तर गोरगरिबांचं मोठं नुकसान होईल, अशी टीका त्यांनी केली.

यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंवर आणखी गंभीर आरोप करत इशाराही दिला. यापुढे मराठ्यांच्या नादी लागू नकोस. माझ्या हत्येच्या कटात तुझा सहभाग असल्याचा मला संशय आहे. दोन-तीन वेळा तुला वाचवलं, पण आता मराठ्यांना त्रास देणं बंद कर, असं जरांगे म्हणाले.तसेच त्यांनी दावा केला की, माझ्या घातपाताच्या प्रकरणाशी संबंधित माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. योग्य वेळी ती समोर येऊ शकते,असंही त्यांनी म्हटलं.
यावेळी जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करत, मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यामागे धनंजय मुंडे कारणीभूत आहेत, असा आरोप केला. तसेच तुझ्यामुळे बहिणीलाही त्रास सहन करावा लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्तीचा विचार मनात आल्याचं म्हटलं होतं. मात्र, नागरिकांचा उत्साह आणि प्रेम पाहून नव्याने प्रेरणा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच "राजकारण माझ्या विचारांशी जुळलं नाही, तर योग्य वेळी एक्झिट घेण्याचीही तयारी आहे," असं त्या म्हणाल्या होत्या.




