बिग बॉस मराठी ६ मध्ये मोठा ट्विस्ट ! उघडणार ‘उल्टा - पुल्टा’ रूम, खेळाचं गणित बदलणार

बिग बॉस मराठी ६ मध्ये मोठा ट्विस्ट ! उघडणार ‘उल्टा - पुल्टा’ रूम, खेळाचं गणित बदलणार

मुंबई - कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. घरात दररोज नवे वाद, बॉण्डिंग, रणनिती आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. खेळ जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आव्हान अधिक कठीण आणि रोचक होत चालले आहेत. अशातच आता बिग बॉसने घरात एका मोठ्या बदलाची घोषणा केली असून, हा ट्विस्ट संपूर्ण गेमच उलथापालथ करणारा ठरणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसणार आहे. बिग बॉसच्या घरात ‘उल्टा - पुल्टा’ रूमचं दार उघडणार आहे. ही केवळ एक खोली नसून, खेळाची दिशा बदलणारी ताकद तिच्यात आहे. बिग बॉसने स्वतः सदस्यांना इशारा देत सांगितलं आहे, “या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल!”

बिग बॉस मराठीच्या घरात आधीच वाद, कल्ला आणि रणनीतींचा धुरळा उडालेला असताना, ‘उल्टा - पुल्टा’ रूममुळे तणाव आणखी वाढणार आहे. बिग बॉस म्हणाले, “या रूममध्ये अख्खा गेम उल्टा - पुल्टा करून टाकण्याची ताकद आहे.” त्यामुळे कोणाची समीकरणं बिघडणार, कोणाचा खेळ अधिक मजबूत होणार आणि कोणाच्या अडचणी वाढणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

काही सदस्य या नव्या ट्विस्टमुळे उत्साहित दिसत आहेत, तर काहींच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे जाणवते. एक गोष्ट मात्र नक्की ‘उल्टा - पुल्टा’ रूम उघडल्यानंतर बिग बॉसच्या घरातील खेळ पूर्वीसारखा राहणार नाही. नक्की काय आहे हे ‘उल्टा-पुल्टा’ प्रकरण? कोणाचं नशीब फिरेल आणि कोणाचा खेळ धोक्यात येईल? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.