बीडमध्ये एफडीएची धडक कारवाई; मुदतबाह्य पदार्थांपासून बनवली जाणारी लस्सी नष्ट

बीडमध्ये एफडीएची धडक कारवाई; मुदतबाह्य पदार्थांपासून बनवली जाणारी लस्सी नष्ट

बीड (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने बीड जिल्ह्यात भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू ठेवली असून विविध ठिकाणी छापे टाकत अन्नपदार्थांची तपासणी केली. या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.बीड शहराजवळील एका लस्सी उत्पादन केंद्रात लस्सी तयार करण्यासाठी मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर होत असल्याचे तपासणीत आढळून आले. यानंतर अधिकाऱ्यांनी तेथील 100 लिटरहून अधिक लस्सीचा साठा नष्ट केला. तसेच संबंधित उत्पादन केंद्र चालकाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली.

दरम्यान, माजलगाव येथे रिफाइंड सोयाबीन तेलाचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला. शिरूर परिसरातही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय पाटोदा तालुक्यातील दोन दूध संकलन केंद्रांची तपासणी करून दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेचा प्रभाव बीड जिल्ह्यातही दिसून येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या या धाडसत्रामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.