बेळगाव-कराड रेल्वे मार्ग चंदगड, गडहिंग्लज, आजरामार्गे नेण्याची मागणी ; कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघटनेची विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

बेळगाव-कराड रेल्वे मार्ग चंदगड, गडहिंग्लज, आजरामार्गे नेण्याची मागणी ; कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघटनेची विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने दक्षिण कोल्हापूर आणि आसपासच्या तालुक्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह इतर वाहतूक सुविधांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या सोबत बैठक पार पडली. यावेळी संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांना दिले 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे नेते राजेंद्र गड्ड्यांनावर यांनी , सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत सुरू करणे, मिरज-कोल्हापूर ब्रॉडगेजचे काम तातडीने पूर्ण करणे आणि मंजूर झालेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू करा, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली. 

दक्षिण कोल्हापुरातील ५ तालुक्यांसाठी रेल्वेची मागणी
चंदगड, गडहिंग्लज, आजरा, कागल आणि भुदरगड या दक्षिण कोल्हापुरातील ५ तालुक्यांना रेल्वे सेवेशी जोडण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. सध्या बेळगाव-कराड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू असून, हा मार्ग मिरज-बेळगाव लाईनला समांतर नेण्याऐवजी चंदगड, गडहिंग्लज आणि नेसरीमार्गे तवंदी घाटाच्या पलीकडून नेल्यास या सर्व तालुक्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असा प्रस्ताव संघटनेतर्फे मांडण्यात आला. 

एसटी गाड्या पूर्ववत करण्याची मागणी
ग्रामीण भागातून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पूर्वी सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या बस गाड्या (उदा. मळगेरी-मुंबई, नेसरी-मुंबई) बंद झाल्या आहेत. सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी या सरकारी बस सेवा पूर्ववत सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. 

जनजागृती आणि लढा सुरूच राहणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन प्रस्तावित होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे या मागण्यांचे पत्र पाठवण्याचे आश्वासन दिल्याने सध्यातरी आंदोलनाला सुरुवात न करता चर्चेचा मार्ग निवडण्यात आला आहे. आगामी काळात या मागण्यांसाठी गाव आणि विभाग पातळीवर जनजागृती करून जनआंदोलन उभारले जाईल व पाठपुरावा सतत सुरू राहील, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. 

तर जिल्हा प्रशासनाने रेल्वे विभागाकडे याबाबत पत्र पाठवण्याचे आश्वासन दिलं आहे. मात्र, या मागण्या मान्य न झाल्यास गाव आणि विभाग पातळीवर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी ॲड. चंद्रकांत निकम, सुनिल कानूरकर, धोंडीबा कुंभार साहेब, उदय पुजारी, ज्योतिबा जाधव, भरत रेडेकर, पांडुरंग रेडेकर, शिवगोंडा पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.