भोंदूबाबा अशोक खरातसोबतचा माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल

भोंदूबाबा अशोक खरातसोबतचा माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई (प्रतिनिधी) : भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात राजकारण्यांचे धाबे दणाणले असून, नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अशोक खरात हा माजी खासदार हेमंत गोडसे यांचा हात पाहून त्यांचे भविष्य सांगताना स्पष्टपणे दिसत आहे. खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी आणि कामात यश मिळवण्यासाठी अनेक बडे नेते रांगा लावत होते, हे तपासात आधीच समोर आले होते. मात्र, गोडसे यांच्या या व्हिडिओमुळे आता प्रत्यक्ष पुरावाच समोर आला आहे. 

अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस कसून तपास करत आहेत. या तपासादरम्यान खालील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. अनेक राजकीय नेते स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी खरातच्या संपर्कात होते. निवडणुकीतील जय-पराजयाचे भाकीत जाणून घेण्यासाठी नेते त्याची भेट घेत असत. हेमंत गोडसे यांनी देखील खरातची भेट घेतल्याने, या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे दिसून येत आहे. 

भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तब्बल १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आल्यानंतर त्याची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली.अशोक खरात सध्या २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असून, विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.