महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज,जून महिन्यात उष्णतेच्या लाटा
मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात यंदा मान्सूनच्या काळात एल निनोचा प्रभाव असल्याने देशातील सरासरी पर्जन्यमान कमी राहील, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवले आहे. शुक्रवारी भारतीय हवामान खात्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला. यापूर्वी एप्रिल महिन्यात हवामान खात्याने संपूर्ण देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता यामध्ये सुधारणा करुन हवामान खात्याने देशात 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील पर्जन्य स्थितीविषयी काही निरीक्षणे नोंदवली आहेत.

भारतीय हवामान खात्याने यापूर्वी दिलेल्या आपल्या पावसाच्या अंदाज घट केली आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहील. यंदाच्या मान्सूवर एल निनोचे सावट आहे. जून महिन्यात हा प्रभाव फार नसेल. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एल निनोचा प्रभाव सर्वसाधारण आणि सप्टेंबर महिन्यात तो सर्वाधिक असेल. याचा विपरीत परिणाम मान्सूनसवर होईल, असे के.एस. होसाळीकर यांनी सांगितले.
चार महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती, पिण्याचे पाणी, ऊर्जा आणि आरोग्य अशा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होईल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असेल. पुढील वर्षभरात याचे प्रतिकूल परिणाम जाणवतील. याशिवाय, जून महिन्यात काही भागात उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. जून महिना हा पावसाच्या संक्रमणाचा महिना आहे. 1 जूनला पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधार 40 ते 45 दिवसांत राजस्थानपर्यंत पोहोचतो. मात्र, मान्सूनला उत्तरेकडे सरकायला उशीर झाला तर काही ठिकाणी उष्णतेचा प्रभाव जाणवतो. एल निनोची वर्ष ही नेहमीच उष्ण वर्ष म्हणून ओळखली जातात, असे के.एस. होसाळीकर यांनी म्हटले.
हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्याने 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यताही 60 टक्के इतकी वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या निकषांनुसार 90 टक्के पाऊस हादेखील कमी मानला जातो. यंदा पावसाचे प्रमाण त्यापेक्षा कमी राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात पावसाचे प्रमाण सरासरीच्या खाली राहण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात एल निनो फारसा सक्रिय नसला तरी जुलै-ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव वाढत जाईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी दिली.




