मौलाना शरद पवारांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय, तुषार भोसलेंची घणाघाती टीका

मौलाना शरद पवारांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय, तुषार भोसलेंची घणाघाती टीका

मुंबई (प्रतिनिधी) : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी केले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य केले. वारकरी संप्रदायात सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, या प्रबोधनाच्या मार्गावर महिलांचा अभाव असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या वक्तव्यावरून भाजपने शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले की, हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे. जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून त्या लोकांसोबत इफ्तार पार्ट्या झोडतात ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही. पण राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलेला आहे. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी कारस्थानं केलीत. आता 40-50 लोकांची टोळी त्यासाठी तयार केलेली आहे. पण, लक्षात ठेवा हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचे षडयंत्र मी शिजू देणार नाही, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केलीय. 

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे की, चिकित्सा करण्याचा त्यांना अधिकार आहे. अर्बन नक्षल देखील वारकरी संप्रदायात आली होती. त्याचा देखील तपास शरद पवार यांच्या रिसर्च टीमनं केला पाहिजे. वारकरी संप्रदायात लोकांचे प्रबोधन करणं याला महत्त्व असतं. अर्बन नक्षल यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात किती शिरलेत याची माहिती देखील आपण समोर ठेवावी. धर्मांध शक्ती वारकरी संप्रदायात नाही, लव्ह जिहाद काहींकडून केला जातो. यावर मात्र शरद पवार बोलत नाहीत.  प्रबोधन केलं जाते, त्याला धर्मांधता म्हणत नाही.  विठ्ठलाची आराधना करणं धर्मांधता नाही, अशी टीका त्यांनी केलीय.