राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे, तर उपाध्यक्षपदी विलासराव कुरणे यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर/ प्रतिनिधी: शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या कोल्हापुरातील प्रसिद्ध 'राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या' अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे. कोल्हापूर शहर सहकारी संस्थेच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला.

बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र वसंतराव पंदारे यांची, तर उपाध्यक्षपदी विलासराव शंकरराव कुरणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. अध्यक्षपदासाठी मधुकर पाटील यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी अतुल जाधव यांनी नावे सुचवली होती.
नूतन अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी सर्व संचालकांचे आभार मानत सभासदांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच आगामी काळात बँकेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून UPI आणि मोबाईल बँकिंग (App) सुविधा सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडीनंतर बँकेच्या मावळत्या पदाधिकाऱ्यांसह नूतन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला असून, सर्व थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी बँकेचे संचालक शशिकांत तिवले, मधुकर पाटील, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, अनुजा रेणके यांच्यासह संचालक मंडळ आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.




