राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स बँकेतर्फे 'पद्मराजे पारितोषिक' वितरण व निवृत्त सभासदांचा सत्कार उत्साहात

राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स बँकेतर्फे 'पद्मराजे पारितोषिक' वितरण व निवृत्त सभासदांचा सत्कार उत्साहात

माणसांच्या गर्दीत माणूस हरवत चाललाय, नात्यांमधील संवाद जपा : वसंत हंकारे यांचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी): राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स को-ऑप. बँक लि., कोल्हापूर या बँकेच्या वतीने 'पद्मराजे पारितोषिक' वितरण, 'सेवानिवृत्त सभासद सत्कार', 'मोफत आरोग्य तपासणी शिबीर', 'ग्राहक मेळावा' आणि बँकेच्या नवीन 'मोबाईल ॲप'चा शुभारंभ सोहळा शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन के.डी.सी.सी. बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर उपजिल्हाधिकारी अजय पवार होते, तर प्रमुख वक्त म्हणून मा. वसंत हंकारे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष रवींद्र चंदारे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडला. बँक १०९ वर्षे पूर्ण करून ११० व्या वर्षात पदार्पण करत असून, ही राज्यातील पगारदार नोकरांची प्रथम क्रमांकाची सहकारी बँक आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच सभासदांना डिजिटल सुविधा देण्यासाठी बँक यूपीआय (UPI) प्रणालीशी जोडली जात असून, १ सप्टेंबर २०२६ पासून बँकेचे मोबाईल ॲप सभासदांच्या सेवेत उपलब्ध होईल, अशी घोषणा त्यांनी केली.

आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा: वसंत हंकारे
प्रमुख वक्त वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा" असा कानमंत्र दिला. "आजच्या माणसांच्या गर्दीत माणूस हरवत चालला आहे. त्यामुळे नात्यांमधील संवाद टिकवणे गरजेचे आहे," असे सांगत त्यांनी संकटांचा हसतमुखाने सामना करणारा माणूसच खऱ्या अर्थाने सुखी होतो, असे स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात मा. अजय पवार यांनी शाहू बँक ही नफ्यासाठी नसून सर्व सभासदांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारी संस्था आहे, अशा शब्दांत बँकेच्या कारभाराचे कौतुक केले. तर अर्जुन आबिटकर यांनी ऑनलाइन बँकिंगच्या काळात बँकेने जपलेल्या विश्वासार्हतेची प्रशंसा करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गुणवंत विद्यार्थी व निवृत्त सत्कार:
 इयत्ता ४ थी ते १२ वी मधील ६५ गुणवंत विद्यार्थ्यांना 'पद्मराजे पारितोषिक' (प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस) देऊन गौरविण्यात आले. तसेच शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सुमारे २२५ सभासदांचा सत्कार करण्यात आला.

मोफत आरोग्य शिबीर:
कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, विविध रोटरी क्लब आणि पॅथक्यूअर लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य शिबीराचा ३०० ते ३५० सभासदांनी लाभ घेतला.

NCMC कार्ड नोंदणी:
एसटी प्रवासासाठी आवश्यक असलेल्या 'NCMC कार्ड' नोंदणी शिबीराचा १०० ते १५० सभासदांनी लाभ घेतला.

कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे, उपाध्यक्ष विलासराव कुरणे, संचालक सर्वश्री शशिकांत तिवले, मधुकर पाटील, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, संजय खोत, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, अरविंद आयरे, किशोर पोवार, प्रकाश पाटील, तज्ञ संचालक दीपक पाटील, गणपत भालकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश पाटोळे यांच्यासह बँक कर्मचारी, सभासद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकेचे उपाध्यक्ष विलासराव कुरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताज मुल्लाणी यांनी केले.