रस्त्यावर कचरा टाकणं पडलं महागात ; कोल्हापूर मनपाची सोशल मीडिया व्हिडिओवरून थेट दंडात्मक कारवाई

रस्त्यावर कचरा टाकणं पडलं महागात ; कोल्हापूर मनपाची सोशल मीडिया व्हिडिओवरून थेट दंडात्मक कारवाई

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सोशल मीडियाचा वापर आता फक्त मनोरंजनासाठीच नाही, तर नियम मोडणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठीही होऊ लागला आहे. कोल्हापुरात सोशल मीडियावरील एका व्हिडिओच्या आधारे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या एका व्हिडिओची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. जरग नगर, पाचगाव रोड परिसरात एक व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. हा व्हिडिओ पाहताच महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली.  

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी करत ओळख पटवण्यात आली. जरग नगर येथील रहिवासी यांच्यावर स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार ही कारवाई करण्यात आली असून, त्यांना तब्बल १५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपल्या सर्वच नागरिकांची जबाबदारी आहे. कचरा उघड्यावर टाकणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कोल्हापूर महानगरपालिकेद्वारे अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.