राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळला? सुनेत्रा पवार-पार्थ पवारांना लक्ष्य केल्याचा अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळला? सुनेत्रा पवार-पार्थ पवारांना लक्ष्य केल्याचा अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधीं) : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट पक्ष नेतृत्वाच्या माहितीत नसल्याचा दावा समोर आल्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही या भेटीची माहिती पक्ष नेतृत्वाला नव्हती, असे सांगितल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत दिले.

मिटकरी यांनी आरोप केला की, पक्षातील काही नेते जाणीवपूर्वक सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवर घेतलेल्या आक्षेपामागेही पक्षातील काहींचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, संबंधित नेत्यांची नावे त्यांनी जाहीर केली नाहीत.

याशिवाय, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे स्वतःचे फोन घेत नसल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकदा संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर इतर पक्षांच्या आमदारांशी ते तत्परतेने संवाद साधतात, अशी टीका त्यांनी केली. अजित पवार उपस्थित असताना अशी परिस्थिती नव्हती, असेही ते म्हणाले. मात्र, भरणे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.