शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनात काळाबाजार
मुंबई (प्रतिनिधी) : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर संस्थानमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिरात 'व्हीआयपी' दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. 11 एप्रिल रोजी नाशिकच्या पंचवटी भागातील भाविक अनंता सुरेश मेहंदळे आणि त्यांचे मित्र दर्शनासाठी आले होते. त्यांनी 200 रुपयांचा अधिकृत देणगी पास घेतला होता, मात्र रांगेत उभे असताना संशयितांनी त्यांना गाठले.
"रांगेतून दर्शनाला 4-5 तास लागतील, आम्ही 10 मिनिटांत दर्शन घडवून देतो," असे आमिष दाखवून संशयितांनी या भाविकांकडून 3 हजार रुपये रोख स्वीकारले. देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत 'पेड दर्शन' सुविधा नसतानाही, भाविकांना आत सोडून त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणात पोलिसांनी सर्वात आधी गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गोटीरामला तात्काळ अटक करण्यात आली, तर अभिषेक कडलग सध्या फरार आहे. तपासादरम्यान या संपूर्ण रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलगचा सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले, यानंतर सोमवारी रात्री पुरुषोत्तम कडलगला अटक करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी प्रवेशासाठी कडक नियम आहेत. सुरक्षारक्षक कोणालाही थेट प्रवेश देत नाहीत; त्यासाठी विश्वस्तांची परवानगी किंवा फोन आवश्यक असतो. नोंदवहीमध्ये भाविकाचे नाव, कोणाच्या सांगण्यावरून प्रवेश दिला याची सविस्तर नोंद करणे बंधनकारक असते. "एवढी काटेकोर व्यवस्था असताना बाहेरील व्यक्ती भाविकांना थेट मंदिरात कशी नेऊ शकतात?" असा सवाल उपस्थित केला जात होता. आता खुद्द विश्वस्तालाच अटक झाल्याने, या भ्रष्टाचाराचे मूळ थेट संस्थानच्या आतपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.




