शहरातील बिकट समस्यांना महापालिकेचा अपुरा निधीच कारणीभूत : नगरसेवक प्रवीण केसरकर

शहरातील बिकट समस्यांना महापालिकेचा अपुरा निधीच कारणीभूत : नगरसेवक प्रवीण केसरकर

कोल्हापूर/प्रतिनिधी :शहर आणि परिसरातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून पसरलेले अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला १५५० एलईडी बल्ब सुपूर्द करण्यात आले. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे बल्ब महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.


अंधाराच्या समस्येवर मोलाची मदत
यावेळी बोलताना नगरसेवक प्रवीण केसरकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पूर्वी काम पाहणाऱ्या कंपनीचे कंत्राट आणि मेंटेनन्सबाबत समस्या निर्माण झाल्यामुळे तसेच महापालिकेकडील अपुऱ्या निधीमुळे हा प्रश्न बिकट बनला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपने पुढे येत १५५० एलईडी बल्ब उपलब्ध करून दिल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी चित्रपट उपक्रम
तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी सध्या मोबाईल व सोशल मीडियाच्या अधिक आधिन होत चालले आहेत. त्यांना देशाचा ऐतिहासिक वारसा आणि थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रम हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत महानगरपालिकेच्या व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना देशसेवा आणि आदर्शांवर आधारित प्रेरणादायी चित्रपट दाखवण्यात येणार असून, हा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

दिलेल्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त हे डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप आणि सतेज (बंटी) पाटील यांचे १५५० एलईडी बल्ब पालिकेला दिल्याबद्दल आभार मानत आहेत व पुढील १० दिवसांत गरज असलेल्या ठिकाणी ते बसवले जातील असे सांगत आहेत.