शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवायचे असेल, तर माती परीक्षण हाच सर्वांत महत्त्वाचा टप्पा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवायचे असेल, तर माती परीक्षण हाच सर्वांत महत्त्वाचा टप्पा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने ‘चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया’ या व्यापक अभियानाची सुरुवात भुदरगड तालुक्यातील पळशिवणे येथे झाली. रासायनिक खते, पाण्याचा अतिरेकी वापर आणि बदलती पीक पद्धती यांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न वाढवायचे असेल, तर माती परीक्षण हाच सर्वांत महत्त्वाचा पहिला टप्पा असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. 

जशी शरीराची तब्येत बिघडल्यावर आपण योग्य तपासणी करूनच औषधोपचार करतो, तशीच तपासणी जमिनीचीही आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा पोत, कस, अन्नद्रव्यांची कमतरता आणि योग्य शेती पद्धती याबाबतचे मार्गदर्शन ‘जमीन आरोग्य पत्रिके'तून स्पष्ट होते. फक्त अहवाल देऊन थांबणे पुरेसे नाही त्या अहवालातील मुद्दे प्रत्येक शेतकऱ्याला समजावून सांगणे ही कृषी विभागाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचा सूचना यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. 

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान आणि हेक्टरी १२५ टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये या अभियानाची एकाच दिवशी अंमलबजावणी झाली असून मार्चपर्यंत २६ हजार शेतकऱ्यांना ‘जमीन आरोग्य पत्रिका’ देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन माती परीक्षणासाठी नमुने घेण्याची शास्त्रोक्त पद्धत तज्ज्ञांच्या मदतीने समजावून सांगण्यात आली. तसेच माती परीक्षण माहिती पत्रिकेचे अनावरण आणि काही शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरणही करण्यात आले. भविष्यकालीन शेती अधिक तंत्रज्ञानाधिष्ठित व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी ‘डिजिटल मदतनीस महाविस्तार’ या AI आधारित मोबाईल ॲपचा वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.

यावेळी कल्याणराव निकम, सरपंच वैशाली कांबळे, माजी सरपंच सारीका जाधव, ग्रामपंचायत सदस्य सातापा आमते, नरेंद्र सुतार, साधना गुरव, अर्चना कुराडे, वैजयंती कदम, पोलिस पाटील संजय पोवार, संतोष पोवार, निलेश रेडेकर, अरविंद म्हांगोरे, प्रकाश जाधव, दिपक पोवार, विजय सांवत, मारुती खोळांबे, सुनिल चांदेकर आदी गावकरी उपस्थित होते.