३ हजार कोटींची कमाई, जगभरात गाजला ‘धुरंधर’; तरी ऑस्करसाठी का नाही झाली निवड?

३ हजार कोटींची कमाई, जगभरात गाजला ‘धुरंधर’; तरी ऑस्करसाठी का नाही झाली निवड?

ऑस्कर २०२७ साठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. तब्बल ३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड झाल्याने या निर्णयाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मात्र याचवेळी रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केलेल्या ‘धुरंधर’ला ऑस्करसाठी संधी का मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


 

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरी सदस्य विवेक वासवानी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘धुरंधर’च्या निवडीबाबत स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्युरीमधील काही सदस्यांना हा चित्रपट आवडला होता. मात्र ऑस्करसाठी हा चित्रपट योग्य ठरेल, असे बहुसंख्य सदस्यांना वाटले नाही.

‘धुरंधर’ला मिळाली फक्त ४ मतं?

ज्युरीसमोर चित्रपट निवडताना भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व आणि ऑस्करसाठी चित्रपटाची उपयुक्तता यांसारख्या निकषांचा विचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निकषांमध्ये ‘धुरंधर’ अपेक्षेप्रमाणे उतरला नसल्याचे विवेक वासवानी यांनी नमूद केल्याचे वृत्त आहे.

१४ सदस्यांच्या ज्युरीमध्ये ‘धुरंधर’ला किती मते मिळाली, असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्याला केवळ ४ मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड

ऑस्करच्या शर्यतीत यंदा विविध भारतीय भाषांमधील एकूण ३३ चित्रपट होते. यामध्ये १४ हिंदी, ४ मराठी, ४ तेलुगू, ३ गुजराती, ३ तमिळ, १ मल्याळम, १ नेपाळी आणि नागालँडमधील एका चित्रपटाचा समावेश होता.

ज्युरीच्या अंतिम तीन पर्यायांमध्ये ‘गोंधळ’, ‘अंग’ आणि ‘मैं वापस आएगा’ या चित्रपटांचा समावेश होता. अखेर ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड करण्यात आली.

दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. या फ्रँचायझीतील पहिला चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये, तर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली असून, संपूर्ण फ्रँचायझीची जगभरातील कमाई सुमारे ३ हजार कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मात्र बॉक्स ऑफिसवरील यश असूनही ऑस्करसाठी ‘धुरंधर’ची निवड झाली नाही. ज्युरीच्या निकषांमध्ये हा चित्रपट मागे पडल्याचे विवेक वासवानी यांच्या स्पष्टीकरणातून समोर आले आहे.