D.Y.Patil Passes Away : शिक्षणातील एक बलाढ्य नेतृत्व गमावले; सुशीलकुमार शिंदे यांनी जागवल्या डी. वाय. पाटलांच्या आठवणी
कोल्हापूर/प्रतिनिधी: देशातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील एक बलाढ्य नेतृत्व, माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानेश्वर पाटील) यांच्या निधनाने अत्यंत मोठा पोकळी निर्माण झाली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांच्यासोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

"देशातील शिक्षण क्षेत्राला नवीन दिशा देणारा आणि बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारा एक जिवाभावाचा सहकारी आज आपल्यातून निघून गेला आहे," अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'ज्ञानेश्वर' हे नाव सार्थ करून दाखवले
माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "डी. वाय. पाटलांचे मूळ नाव ज्ञानेश्वर पाटील होते. त्यांच्या वडिलांनी ठेवलेले 'ज्ञानेश्वर' हे नाव त्यांनी खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवले. त्यांनी आपल्या अखंड आयुष्यात समाजाला ज्ञान देण्याचे, गरिबांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले. त्यांनी उभारलेली भव्य विद्यापीठे, महाविद्यालये आणि ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारीवर्ग ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात."
राज्यपाल असतानाही कधी सत्तेचा गर्व केला नाही
सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले की, "आम्ही दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकत्र काम केले, त्यानंतर राष्ट्रीय राजकारणातही सोबत राहिलो. ते तीन राज्यांचे राज्यपाल झाले आणि मीही राज्यपाल झालो, परंतु आमच्यातील मैत्रीचे बंध कधीही तुटले नाहीत. राज्यपालसारख्या उच्च पदावर असतानाही त्यांनी कधी सत्तेचा रुबाब दाखवला नाही. अत्यंत सौजन्याने आणि नम्रतेने ते सर्वांशी वागत असत."
शेवटपर्यंत काँग्रेस विचारांशी प्रामाणिक
डी. वाय. पाटील यांच्या निष्ठावंत राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, "डी. वाय. पाटील म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे डी. वाय. पाटील असे समीकरण होते. सत्तेत काही मिळो अथवा न मिळो, त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचारांची आणि पक्षाची साथ कधीही सोडली नाही. आजच्या राजकारणात अशी निष्ठा दुर्मिळ आहे."
दीड महिन्यापूर्वी झालेल्या भेटीची आठवण सांगताना शिंदे भावूक झाले. "डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका मोठ्या मार्गदर्शकाला मुकला आहे," असे म्हणत त्यांनी पाटील कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या.




