MPSC परीक्षा पेपरफुटीचा गंभीर आरोप: आमदार रोहित पवारांची तुकाराम मुंढेंच्या भेट, नेमकं काय म्हणाले अधिकारी?
मुंबई: देशभरात नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीवरून मोठा रोष निर्माण झाल्यानंतर, आता महाराष्ट्रातही MPSC च्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अन्न व औषध निरीक्षक (Food and Drug Inspector) पदाच्या परीक्षेमध्ये मोठा गैरव्यवहार आणि पेपर लीक झाल्याचा दावा करत त्यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. या प्रकरणी स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

रोहित पवारांचे गंभीर आरोप आणि मागण्या
आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २२ मार्च २०२६ रोजी 'अन्न व औषध निरीक्षक' (जाहिरात क्र. १६/२०२५) पदाची परीक्षा पार पडली होती. मात्र, परीक्षेच्या दोन दिवस आधीच कथित प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रसारित झाल्याचे आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी त्याचे ९० टक्के साम्य असल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर "१०० पैकी ९० प्रश्न जुळले" आणि "मोबाईलवरून नक्कल" अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले असून, ज्या उमेदवाराला २० मार्च रोजी हे फोटो मिळाले होते, त्याला परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील सर्व नियुक्त्या तात्काळ स्थगित कराव्यात आणि परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्यात यावी, अशी आक्रमक मागणी रोहित पवारांनी केली आहे.
तुकाराम मुंढे यांचे आश्वासन
रोहित पवारांच्या भेटीनंतर बोलताना, हा संपूर्ण विषय MPSC आयोगाच्या अखत्यारित येत असल्याने यासंदर्भातील सर्व कागदपत्रे व पुरावे आयोगाकडे सोपवण्यात येतील आणि आयोग त्याबाबत योग्य ती कारवाई करेल, असे आश्वासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
MPSC ची भूमिका: पोलीस तक्रार दाखल होणार
या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव महेंद्र हरपाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका तक्रारदाराने स्वतः ई-मेल पाठवून कोणतीही तक्रार नसल्याचे कळवले असले, तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेत MPSC कडून आता रीतसर पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.




